बेळगाव महानगरपालिकेचे महसूल विभागाचे अधिकारी एस बी दोडगौडर यांनी पालिका आयुक्त आणि काही अधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप करत प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार नोंदविली होती. या विरोधात आज पालिका कर्मचाऱ्यांनी एस बी दोडगौडर यांच्याविरोधात आंदोलन छेडले.

बेळगाव मनपा महसूल विभागाचे अधिकारी एस बी दोडगौडर यांनी केलेल्या तक्रारींवर संतापलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी, एससीएसटी कर्मचारी संघ आणि इतर कर्मचाऱ्यांनी मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

यावेळी बोलताना गुंडाप्पाणावर म्हणाले, महसूल अधिकाऱ्यांनी काही अधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप करून तक्रार दाखल केली आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नाही. त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी आपण करत असल्याचे गुंडाप्पाणावर म्हणाले. जोवर त्यांची बदली करण्यात येत नाही तोवर आम्ही धरणे आंदोलन सोडणार नसल्याचे ते म्हणाले.
यानंतर बोलताना पालिका कर्मचारी विजय कोट्टुरू म्हणाले, दोडगौडर यांनी केलेले आरोप हे चुकीचे असून त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक हि तक्रार करण्यात आली आहे. त्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात बोलताना पालिका कर्मचारी मंजुश्री यांनीही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केल्याचे सांगितले. पालिका आयुक्त रुद्रेश घाळी हे उत्तमरीत्या काम करत आहेत. परंतु तरीही दोडगौडर यांनी चुकीच्या तक्रारी दाखल केल्या असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या भूमिकेविरोधात आम्ही सर्वांनी आज धरणे आंदोलन छेडले असून त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी मंजुश्री यांनी केली. (
यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी म्हणाले, महसूल विभागाचे अधिकारी एस बी दोडगौडर यांनी पालिका कर्मचाऱ्यांवर चुकीचे आणि खोटे आरोप केले आहेत. यापूर्वी देखील पालिका कर्मचाऱ्यांनी दोडगौडर यांच्याविरोधात माझ्याकडे तक्रार केली आहे. परंतु त्यांच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नसून आता कर्मचाऱ्यांनी दोडगौडर यांच्याविरोधात आंदोलन छेडले आहे. दोडगौडर यांनी केलेल्या आरोपासंदर्भात सर्व दाखले घेऊन जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन दोडगौडर यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा भरवसा देण्यात आला असून त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचीही विनंती आपण केली असल्याचे घाळी म्हणाले.
आपल्यावर आणि पालिका उपायुक्ता लक्ष्मी निपाणीकर यांच्यावर एस बी दोडगौडर यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आपल्याला माहित नसून हि सर्व माहिती मला प्रसारमाध्यमांकडून मिळाली आहे. पालिका कर्मचारी किंवा जनतेकडून दौडगौडर यांच्यासंदर्भात योग्य अभिप्राय आला नसल्याचे सांगत आपल्यावर झालेले आरोपाविरोधात आज आंदोलन छेडण्यात आले आहे, असे घाळी म्हणाले.
पालिका महसूल अधिकारी एस बी दोडगौडर यांनी केलेले आरोप हे अत्यंत खोटे असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांची बदली करावी अशी मागणी करत पालिका कर्मचाऱ्यांनी आज धरणे आंदोलन छेडले आहे. यासंदर्भात प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन रुद्रेश घाळी यांनी दिले आहे.